मित्रहो,
अवाक् होणं म्हणजे काय असा प्रत्यय माणसाला क्वचितच येतो. परवा म्हणजे  २ ऑगस्टला असाच प्रत्यय आला दोन नाट्यकृती बघताना!!! ‘नाट्यकृती या साठीं कि ‘विचार करा’ अशी कृती या दोन्ही नाट्यप्रयोगात आपल्याला करायला लावते म्हणून.
भरत नाट्य मंदिरात ‘सॉरी परांजपे’ आणि ‘खैरलांजी एपिसोड-२’ हे प्रयोग पाहिले. खरंतर मी यातला ‘सॉरी परांजपे’ चा प्रयोग आधीसुद्धा पाहिला होता (मन भरत नाही कधी कधी) आणि दुसरा पहिल्यांदाच पाहिला. चिन्मय देवनं लिहिलेलं  आणि ऋषी मनोहरने दिग्दर्शित केलेलं ‘सॉरी परांजपे’ हे नाटक बघताना प्रत्येक वेळी प्रत्येक प्रेक्षक नाटकात मांडलेला विषय डोक्यात ठेवूनच बाहेर पडतो. मध्ये तर दोन-तीन लोकांनी संपल्यानंतर वडापावच्या इथे त्या विषयावर गहन चर्चा केली तीसुद्धा मी ऐकली. खर तर हाच नाटकाचा प्रभाव म्हणता येईल; विषय डोक्यातून सुटत नाही हातात वडा-पाव असूनही!!! मी कोणत्याही परिस्थितीत दोन्ही नाटकांच्या कथा मुद्दामच सांगणार नाहीये, तुम्ही स्वतः जाऊन नाटक बघावं अशी माझी इच्छा आहे. चिन्मय चं लिखाण हे अतिशय साधं म्हणजे कोणताही विषय साध्या, सोप्या, वापरातल्या शब्दात तो लिहितो (सांगतो!!) त्यामुळेच  प्रेक्षक शब्दात अडकत नाही आणि त्या लेखनाच्या जोडीला ऋषी, गंधर्व, आदित्य आणि हेमांगी यांचा अभिनय. नाटक हे आभासा सारखं असतं; प्रेक्षकाला “समोर घडतय ते खरं आहे असंच वाटलं पाहिजे” हा त्यामागचा हेतू आणि तो अगदी जमून आलाय.
त्यानंतरच्या नाटकाने तर माणसं जागची हल्लीच नाही (संपल्यानंतरसुद्धा!!!) खैरलांजी हत्याकांडाबद्दल वाचायला बरच मिळेल पण त्याच्या पुढे काय घडलं हे समजण्यासाठी फक्त आणि फक्त हे नाटकच बघावं लागेल म्हणजे डॉक्युड्रामा म्हणा नां!!  या विषयावर नाटक करणं हे मोठं धाडसाचं काम आणि एकपात्री करणं म्हणजे…. असो. सुमेधकुमार इंगळे ने अभ्यासलेले, लिहिलेले, दिग्दर्शिलेले आणि अभिनय केलेले ‘हे’ नाटक. खरंतर वर एकपात्री म्हटलंय त्यातच  हे सगळेच विषय आले. पण मी मुद्दाम परत एकदा हे लिहिले याचं कारण म्हणजे ही सर्व डिपार्टमेंट वेगळी आहेत हे सांगण्यासाठी. एकपात्री असं पटकन म्हणतो आपण ; पण त्यामागे एवढं सगळं असतं हे लक्षात यायला हवं.आणि ते सुमेधकुमार याने एका करंगळीवर उचलावं तसं लीलया पेललंय.
थोडक्यात, ‘आजकल’ या संस्थेने नावाप्रमाणेच आजचे विषय घेतले आणि विचार करायला लावले. “आजकालची तुम्ही पोरं नुसतं मोबाईलवर असता!! देश कसा पुढे नेणारssss” हि वाक्य घशातच  ठेवावी लागतील असे सामाजिक भान ठेवून अभ्यास पूर्ण केलेले हे प्रयोग. पुन्हा याचा प्रयोग असेल तर नक्कीच बघायला जा.

अमोघ वैद्य

Leave a comment